जोखीम असलेल्या खात्यांकडे लक्ष द्या; शक्तीकत दास यांची बँकांच्या संचालक मंडळांना सूचना

मुंबई – गेल्या दोन तिमाहीत बँकांचे ताळेबंद उत्तम आहेत. मात्र बँकांच्या संचालक मंडळांनी जोखीम असलेल्या खात्यांकडे व क्षेत्राकडे लक्ष ठेवून बँकिंग व्यवस्था मजबूत राखण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना पुन्हा रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यवसायिक बँकांना केले आहे.
खासगी बँकांच्या संचालक मंडळांच्या सदस्यांच्या बैठकीत बोलताना दास यांनी सांगितले की, अयोग्य कारण दाखवून बँकिंग उत्पादने विकण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. त्याचबरोबर योग्य केवायसी न करता खाते उघडू नये. एखाद्या क्षेत्रातील कर्ज वसुलीवर परिणाम होत आहे का हे लवकर ध्यानात घ्यावे आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी वेळेत उपाययोजना कराव्यात. अन्यथा हा प्रश्न वाढून त्याचा एकूणच बँकिंग व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. विशिष्ट क्षेत्राला जास्त कर्ज देण्याचे टाळावे आणि कर्जपुरवठा संतुलित पद्धतीने होत राहील याची काळजी घ्यावी.
बँका कार्यक्षमता वाढविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यातील काही भाग आऊटसोर्स केला जातो किंवा तिसर्या पक्षाकडून घेतला जातो. अशा परिस्थितीत त्याचा एकूण बँकिंग डिजिटल व्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण अशा प्रकारच्या तक्रारी बर्याच ग्राहकाकडून होत असल्याचे आढळून येत आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्राने उत्तम कामगिरी केली आहे. सध्या बँका समोर अनेक संधी आहेत. त्याचबरोबर जोखीमही आहे. याचे संतुलन राखले जाईल यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बँकांची अनुत्पादक मालमत्ता कमी होत आहे. त्यामुळे या बँकांना तरतूद कमी करावी लागत आहे. यामुळे बँकांचा नफा वाढत आहे. याचा व्यापार बँकांची व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि विस्तारासाठी करण्याची गरज आहे. भारताला वेगात वाढायचे असेल तर बँकिंग क्षेत्र मजबूत राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.





