दहा रुपयांच्या मोबाईल रिचार्जसाठी पावणे पाच लाख गमावले

पुणे – दहा रुपयांच्या मोबाईल रिचार्जसाठी एका व्यक्तीला पावणे पाच लाख रुपये गमावण्याची वेळ आली. या व्यक्तीच्या बॅंक खात्यातून सायबर चोरट्याने फोन पे व पेटीयमच्या माध्यमातून पैसे वर्ग करुन घेतले.
कमलेश प्रकाशचंद जैन (38, रा.गिरगाव रोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादीला सायबर चोरट्याने एअरटेल कंपनीकडून बोलत असल्याचे सांगतले. त्यांना तुमच्या मोबाईलचे इंटरनेट पॅक आज संपले असून आम्ही लॉकडाऊन असल्याने ऑनलाईन रिचार्ज करुन देतो असे सांगितले. मात्र सुरवातीला फिर्यादीला संशय आल्याने त्यांनी रिचार्जला नकार दिला होता. मात्र सायबर भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवत दहा रुपयांचा रिचार्ज एअरटेल थॅक्स ऍपवरुन भरण्यास भाग पाडले. या नंतर फिर्यादीस रिचार्ज झाले असल्याचे खोटे सांगत एक टेक्स्ट मेसेज पाठवून तो टेक्स्ट मेसेच 121 क्रमांकावर पाठविण्यास सांगितला. यानंतर फिर्यादीचा मोबाईल अचानक बंद पाडला. हा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर ऍक्सेस घेऊन त्याव्दारे त्यांच्या एचडीएफसी बॅंकेतून 4 लाख 89, 935 रुपये फोन पे आणि पेटीयम पेव्दारे वर्ग करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक खटके करत आहेत.





