‘पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू; पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची भरती

पुणे – शासनाच्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी “पवित्र पोर्टल’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी नव्याने सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

“पोर्टल’वर पूर्वी 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीही “पोर्टल’वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्वच उमेदवारांना एकदमच शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविता यावा यासाठी नवीन सर्व्हर विकसित करून ते पोर्टलवर अपलोड करण्यासाठी “पोर्टल’ गेल्या 20 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले होते. सर्व्हरच्या तपासणीचे कामही काही दिवस एनआयसीमार्फत सुरू होते. ते काम पूर्ण झाले आहे.

उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा आता लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकरीता महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, वयोमर्यादा, निवडीची कार्यपद्धती, मानधन किंवा वेतनश्रेणी, मागासवर्गीय आरक्षण, महिलांचे आरक्षण, पदवीधर व पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षण, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, ओळखपत्र, संगणक हाताळणीचे ज्ञान, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे आदींसह सर्वसाधारण सूचनाही पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या आहेत.

अभ्यास करून प्राधान्यक्रम नोंदवावेत
उमेदवारांना मुलाखतीशिवाय नियुक्‍त्या देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी शाळा तसेच मुलाखतीसहीत नियुक्‍त्या देणाऱ्या खासगी संस्था अशा दोन भागात प्राधान्यक्रम देता येणार आहेत. उमेदवारांची निवड त्यांच्या बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गुण, जातीचा संवर्ग, समांतर आरक्षण, विषय, शैक्षणिक पात्रताच्या आधारे प्राधान्यक्रमानुसार जागा उपलब्ध असतील. त्या जागेसाठी निवडला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास करून प्राधान्यक्रम नोंदवावेत. प्राधान्यक्रम अंतिम केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार आहे.

मुलाखतीसाठी 10 जणांना बोलविणार
खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एका जागेसाठी 10 जण याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. एका उमेदवारांना दहा ठिकाणी मुलाखतीला जाता येणार आहे. यावेळी मुलाखतीच्या वेळी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुण विचारात घेण्यात येणार नाहीत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यातील 30 गुणांच्या आधारे होणार आहे. उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची संस्था निवड करणार आहे. मुलाखतीला उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची संस्था गुणांनुक्रमे यादी तयार करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे.

…तर उमेदवारांना अपात्र ठरविणार
पवित्र पोर्टलवर हेतूपुरस्पर खोटी, चुकीची व अपूर्ण माहिती देणे, खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्याच्या प्रतितील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे, बनावट दाखले सादर करणे, गैरवर्तणूक करणारा उमेदवार निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबरोबरच इतर शिक्षेसही उमेदवार पात्र ठरविण्यात येणार आहे. नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्यांपासून व तोतयागिरीपासून अर्जदाराने सावध राहावे. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयास कळवावी, अशा सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.