Pavana River Pollution: पवना नदी पुन्हा रासायनिक फेसाखाली गुदमरली! थेरगावमधील ‘ते’ दृश्य पाहून नागरिक संतापले
Pavana River Pollution: महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह; दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी.

Pavana River Pollution – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना नदी पुन्हा एकदा प्रदूषणामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या रंगाचा फेस साचल्याचे चित्र समोर आले. थेरगावातील केजूदेवी बंधारा आणि परिसरातील नागरिकांनी हे दृश्य पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. नदीच्या पाण्यावर पसरलेला पांढऱ्या फेसाचा थर आणि परिसरात जाणवणारी दुर्गंधी यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नाने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एकेकाळी स्वच्छ आणि प्रवाही असलेली पवना नदी आज प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. नदीत संशयित रासायनिक सांडपाणी आणि अशुद्ध पाणी मिसळले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी सातत्याने करत आहेत. त्यातून नदीचे नैसर्गिक स्वरूप बदलत चालले आहे. जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून नदीची पर्यावरणीय क्षमता कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी सकाळी समोर आलेल्या दृश्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नदीच्या पाण्यावर सर्वच ठिकाणी फेसाचा जाड थर दिसून आला. काही भागात पाण्याचा रंगही बदललेला असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्याच्या तोंडावर नदीची अशी अवस्था चिंताजनक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आले.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, नदीतील प्रदूषणाच्या घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत. वारंवार अशा घटना घडत असूनही त्यामागील कारणांचा कायमस्वरूपी शोध लागलेला नाही. नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने हा प्रकार सुरूच असल्याचा आरोप केला जात आहे.
लाखो नागरिकांची तहान भागविणारी नदी
महापालिकेचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नदी संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात नदीची स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्ष काम यामधील दरी पुन्हा समोर आली आहे. पवना नदी ही केवळ जलस्रोत नाही. ती शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार आहे.
कठोर कारवाईची गरज
नागरिकांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, प्रदूषणाचे स्रोत शोधावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नदी संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवून पवना नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. पवना नदीतील फेसाचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा विषय राहिलेला नाही. तो आता शहराच्या आरोग्याचा, जलसुरक्षेचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा विषय बनला आहे.






