Pavana Pipeline Project: १५ वर्षांनंतरही मावळ पेटून उठणार? तीन शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर पुन्हा आरपारची लढाई
Pavana Pipeline Project: 'मावळच्या हक्काचं पाणी पळवू देणार नाही'; ९ ऑगस्टच्या हुतात्मा स्मृतिदिनी शेतकरी आक्रमक, गावागावांत बैठका घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार.

Pavana Pipeline Project – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी तालुक्यातील बऊर येथे झालेल्या आंदोलनाला १५ वर्षे पूर्ण झाली. या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस गोळीबारात कांताबाई ठाकर, शामराव तुपे आणि मोरेश्वर साठे या तीन शेतकऱ्यांना हौतात्म्य आले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येळसे येथील स्मृतिस्थळावर सोमवारी श्रद्धांजली सभा घेण्यात आली.
यावेळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केले. बऊर येथून सकाळी प्राणज्योत आणण्यात आली. दुपारी १२.४० वाजता येळसे येथील स्मृतिस्थळावर प्राणज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. पवना धरण आणि पवनामाईचे पाणी मावळच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेचे भारत ठाकूर यांनी २०११ मधील आंदोलनाची आठवण करून दिली. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असताना बंदिस्त जलवाहिनीचा आग्रह धरू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
१० ऑगस्टनंतर गावागावांत बैठका घेऊन शेतकऱ्यांना संघटित करण्यात येईल. गरज पडल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पवना धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त अध्यक्ष नारायण बोडके यांनी ९ ऑगस्ट २०११ हा पवन मावळच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे सांगितले. पवना बंदिस्त जलवाहिनी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा थांबवणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
२ ऑक्टोबरपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. रविंद्र भेगडे यांनी जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्याची मागणी केली. मावळच्या पाणी, शेती आणि भविष्यासाठी सर्वपक्षीयांनी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मावळच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी बलिदान दिल्याचे सांगितले.
हा लढा अद्याप संपलेला नाही – माजी राज्यमंत्री भेगडे
माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी ९ ऑगस्ट २०११ हा पवन मावळसह महाराष्ट्रासाठी कधीही न विसरता येणारा काळा दिवस असल्याचे सांगितले. गेल्या १५ वर्षांपासून पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात सर्वांनी एकजुटीने लढा दिला आहे. हा लढा अद्याप संपलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नसल्याची भूमिका घेतल्याचे सांगत, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मावळच्या हितासाठी सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहन भेगडे यांनी केले.






