Paud Kolwan Road: डंपरचालकाचा बेधुंद कारभार! ब्रेक दाबला अन् पौड रस्ता दगड-मातीने झाकला; पाहा काय घडलं?
Paud Kolwan Road: पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयासमोर सुमारे दोनशे मीटरपर्यंत पसरला ढिगारा; दुचाकी घसरल्याने अपघात!

Paud Kolwan Road – पौड ते कोळवण (ता. मुळशी) रस्त्यावर डंपरचालकाच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवारी रात्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगडमाती सांडली. पौड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयासमोर सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत हा ढिगारा पसरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. मात्र, माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत कार्यतत्परता दाखवत अवघ्या तासाभरात रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पौडहून कोळवणच्या दिशेने दगड-गोटे आणि मातीने खचाखच भरलेला एक डंपर चालला होता. रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने डंपरचा वेग जास्त असावा. त्यातच विद्यालयासमोर असलेला गतिरोधक (स्पीडब्रेकर) न दिसल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे गाडीला मोठा झटका बसून डंपरमधील दगडगोटे व माती रस्त्यावर रस्त्यावर विखुरली. यानंतर डंपरचालक मात्र तिथून गाडीसह पळून गेला.
रस्त्यावरील दगडमातीमुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मुळा नदीच्या दिशेने उतार असल्याने वेगात येणारे काही दुचाकीस्वार या दगडमातीवरून घसरून पडले. कोणताही मोठा अपघात होऊ नये, म्हणून पौड विद्यालयाचे प्राचार्य एस. व्ही. भोकरे यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुळशी तालुका उपअभियंता संजय मांगडे यांना याबाबतची माहिती दिली.
डंपरचालकांचा मनमानी कारभार
या घटनेमुळे तालुक्यातील डंपरचालकांचा मुजोर आणि बेदरकार कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुळशी तालुक्यात सध्या दगडमातीची अवैध डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. वाहतूक आणि महसूल नियमांना पायदळी तुडवत हे चालक इतर वाहने व पादचाऱ्यांचा विचार न करता गाड्या चालवतात.
दोन महिन्यांपूर्वीच रिहे खोऱ्यातील कातरखडक येथे रिंगरोडच्या कामावरील डंपर घरात घुसून एका महिलेचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी पोलीस आणि महसूल विभागाचे डोळे चुकवून ही वाहतूक सुरू असते. त्यामुळे प्रशासनाने सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित डंपरचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





