भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या एका बंडखोर उमेदवाराने केला आहे. नाना पटोले यांनी मला निवडणुकीची तयारी करण्याची सूचना केली आणि ऐनवेळी मला डावलले, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे चांगलेच तापले आहेत.
या निमित्ताने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची चिखलफेकही सुरू झाली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनीही यासंबंधी काँग्रेस प्रदेशाधय्क्ष नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या उमेदवारीचे आमिष दाखवत ऐनवेळी दगा दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रेमसागर गणवीर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हणाले, नाना पटोले यांनी मला निवडणुकीची तयारी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मी तयारी केली.
मी मागील 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होतो. त्यामुळे मलाच उमेदवारी मिळेल असा मला विश्वास होता. पण पटोले यांनी ऐनवेळी मला डावलले. त्यांच्यामुळे आज माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले. नाना पटोले यांनी माझ्यावर फार अन्याय केला. यामुळे माझ्यावर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर दलितांच्या अस्मितेचे संरक्षण करण्यासाठी अपक्ष म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे, असे प्रेमसागर गणवीर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पूजा थावकर यांना उमेदवारी दिली आहे. तर सत्ताधारी महायुतीने नरेंद्र भोंडेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मतदारसंघात पूजा थावकर विरुद्ध नरेंद्र भोंडेकर असा दुरंगी सामना पहावयास मिळणार आहे. त्यातच या मतदारसंघात गणवीर यांच्यासारख्या अन्य काही नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे येथील निवडणूक अतितटीची झाली आहे.