पुणे | शक्तिप्रदर्शनाने पाटील यांचा अर्ज दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप व महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांंनी आज (दि. २४) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवीजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी,
भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, शंकर महाराज आणि मृत्युंजयेश्वर मंदिरात दर्शन घेऊन डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज आणि कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत कोथरूडकरांनी भाजपवर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरूडमधून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या योजना आणि चंद्रकांत पाटील यांनी राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे कोथरूडची जनता समाधानी आहे. त्यामुळे यंदाही चंद्रकांत पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. – मुरलीधर मोहोळ – केंद्रीय राज्यमंत्री




