पिंपरी | सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

कामशेत, {चेतन वाघमारे} – पावसाळा म्हटलं की दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे होणारे आजार यांचे प्रमाण वाढते. मावळ तालुक्यात सगळीकडेच सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणवठे प्रदूषित होत असून अनेकदा दुषित पाणी पिण्यात येते. दुसरीकडे अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरून त्यातून आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. तालुक्यात ग्रामीणसह शहरी भागात सर्दी, ताप, खोकला, थंडी असे आजार झालेले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा रुग्णांनी दवाखाने भरल्याचे दिसत आहे.
कामशेत शहरामध्ये सर्दी, खोकला, ताप, थंडी आदी आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक देखील चांगल्या उपचारासाठी कामशेत शहरात येतात. त्यामुळे अशा रुग्णांची संख्येत भर पडत आहे. बहुतांश दवाखाने या रुग्णांमुळे भरलेले दिसत आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या आजारांनी ग्रस्त आहेत.
कमी जास्त पावसामुळे, वातावरणीय बदलामुळे तसेच स्वच्छता नसणाऱ्या ठिकाणी विविध आजार जन्म घेतात. अशा परिस्थितीत घरातील सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात मुलांबरोबरच पालकांचा थोडासा निष्काळजीपणा आजाराच्या आहारी नेऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच आरोग्य जपणे आवश्यक आहे.
ही काळजी घ्या –
पावसाळ्यात सर्वत्र चिखल किंवा घाण पसरते. अशा परिस्थितीत घर आणि परिसराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. अनेकदा मुले घरातील फरशी जमिनीवर बसतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे घरातील फरशी नेहमी स्वच्छ ठेवावी. तसेच घराचा परिसर देखील वेळोवेळी स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त करावा.
डासांची पैदास होऊ देऊ नका –
पावसाचे आगमन होताच डेंग्यू, मलेरियासह अनेक आजार पसरू लागतात. अशात आपले घर हे डासांचे घर बनवण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. घरात कुठेही पाणी साचू देऊ नका. कुलर, भांडी, टबमध्ये ठेवलेले पाणी वेळोवेळी स्वच्छ करावे. लहान मुलांना नेहमी मच्छरदाणीखाली झोपवावे.
घरी शिजवलेले अन्न खा –
पर्यटनासाठी बाहेर पडल्यावर बाहेरचे अन्न खाणे वाढते. मात्र शक्यतो उघड्यावरील अन्न खाणे टाळावे. इतर वेळी मात्र घरचेच अन्न खावे. लहान मुलांना नेहमी घरी शिजवलेले ताजे अन्न द्यावे. तसेच पावसाळ्यात उघडे अन्न अथवा खूप दिवसांचे पदार्थ यांवर बुरशी वाढते. त्यामुळे ताजे अन्न बनवून खाण्यावर भर द्यावा.





