Satara: पूर्ण कारभारी नसल्याने जिल्हा रुग्णालय निर्णयाविना रुग्णांना मनस्ताप; डॉ. राहुल जाधव यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित
Satara प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणारे डॉ. राहुल जाधव यांच्या कायम नियुक्तीचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक कार्यालयात अद्यापही प्रलंबित असल्याने जिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रभारी व्यवस्थेवरच सुरू आहे.

Satara: क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराला पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक कधी मिळणार, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणारे डॉ. राहुल जाधव यांच्या कायम नियुक्तीचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक कार्यालयात अद्यापही प्रलंबित असल्याने जिल्हा रुग्णालयाचा कारभार प्रभारी व्यवस्थेवरच सुरू आहे. परिणामी प्रशासनातील निर्णय प्रक्रिया रखडत असून रुग्णसेवेवर त्याचा थेट परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या या रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाचे पदही रिक्त आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निकषांनुसार महत्त्वाची पदे भरली जाणे आवश्यक असतानाही ती रिक्त असल्याने प्रशासनात समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, ओपीडी विभागात शिकाऊ डॉक्टरांवर वाढते अवलंबित्व असल्याने अनेक रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अपुरी संख्या आणि ऑन- कॉल सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे रुग्णसेवेचा दर्जा घसरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या कार्यालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू झाली आहे.
रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असताना रिक्त पदांचा अनुशेष, अपुरी मनुष्यबळ व्यवस्था आणि पूर्णवेळ नेतृत्वाचा अभाव यामुळे प्रशासनाचा गाडा अनास्थेच्या चिखलात अडकला असल्याची टीका होत आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय रखडत असल्याने रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. कायमस्वरूपी जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्तीचा प्रस्ताव नेमका कोणाच्या लालफितीत अडकला आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या प्रमुख शासकीय रुग्णालयाला सक्षम आणि पूर्णवेळ नेतृत्व कधी मिळणार, याकडे नागरिकांसह आरोग्य विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.





