nagar | पाथर्डीच्या बसला पुण्यात अपघात

पाथर्डी, द (प्रतिनिधी)- एसटी बसचा तांत्रिक बिघाड होऊन पाथर्डी – मुंबई या पाथर्डी आगाराच्या बसचा पुण्या जवळ अपघात होऊन यामध्ये चालक गंभीर तर आठ प्रवासी जखमी झाला आहे. ही अपघाताची घटना रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पाथर्डी आगारातून रोज रात्री साडेआठ वाजता मुंबईसाठी रातराणी बस निघते. शनिवारी रात्री चालक सतीश वारे हे बस घेऊन नगरहून पुण्यामार्गे मुंबईकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील पेरणे फाट्यानजिक एसटी बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने समोरच्या ट्रकवर बस धडकून डिव्हायडरला आदळली.
त्यामध्ये एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहक संभाजी जायभाय यांच्यासह सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहे. पाथर्डी आगारातील सर्वच बसेस सुस्थितीत नसून रस्त्यावर धावताना कधी आणि केव्हा कुठेही बंद पडेल याचा कोणीही भरोसा देऊ शकत नाही.
रस्त्यावर बस बंद पडणे हे नित्याचे झाले असल्याने या जुन्या बस गाड्या रस्त्यावर धावणे योग्य नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. लांब पल्यांसाठी लागणाऱ्या चांगल्या गाड्या या पाथर्डी आगारात नसल्याने सध्या धावणाऱ्या गाड्या कधी वेळेवर पोहोचत नाही.
गाड्यांचे किलोमीटर क्षमता संपली असून देखभाल दुरुस्तीसाठी या गाड्यांना वेळ सुद्धा मिळत नाही. वेळ मिळाला तर गाड्यांचे सुट्टे भाग वेळेवर मिळत नाही. अशा खराब गाड्या चालवणे ही पाथर्डी आगारातील चालकांची कमालाची कसरत आहे. ही कसरत आता चालक वाहक आणि प्रवाशांच्या जीवावर अपघाताने बेतली आहे.
पाथर्डी आगाराची एकही बस प्रवास करण्याच्या योग्यतेची नसून एसटी आगाराचा ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठीचा फटका बसत आहे. एसटीची सेवा ही अत्यंत जीवघेणी झाली आहे. एसटीचा कारभार सुधारून नवीन बसेस पाथर्डी आगाराला मिळावे , त्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी दिला आहे





