इंदापूरात व्याजमाफीचा मार्ग मोकळा; संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश

इंदापूर : इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलनाला अखेर यश आले असून, इंदापूर नगरपालिकेने थकबाकीच्या मालमत्ता करावरील 100 टक्के व्याज आणि शास्ती माफीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, असे आवाहन समितीने केले आहे. तसेच, 1 एप्रिल 2017 पासून इंदापूर शहरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे भरलेल्या व्याजाच्या रकमेचा परतावा किंवा त्याचे भविष्यकालीन घरपट्टीत समायोजन करावे, अशी मागणीही समितीने शासनाकडे केली आहे.
आठ वर्षांचे आंदोलन, शासनाचा निर्णय
इंदापूर नगरपालिकेने 1 एप्रिल 2017 पासून शहरातील मालमत्ता आणि खुल्या जागांवरील घरपट्टीवर 24 टक्के वार्षिक व्याज लावले होते. याविरोधात इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने गेल्या आठ वर्षांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले. 27 मार्च 2023 पासून तर समितीने नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, नगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते. समितीने संबंधित अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी सातत्याने भेटी घेऊन पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना यश आले आणि शासनाने समितीच्या आंदोलनाची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी व्याज आणि शास्ती माफीच्या अभय योजनेची घोषणा केली. यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. मात्र, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मध्ये व्याजमाफीची तरतूद नसल्याने अडचण निर्माण झाली होती. यावर तोडगा काढत मंत्रिमंडळाने कायद्यात दुरुस्ती करून 30 एप्रिल 2025 रोजी राज्यपालांच्या सहीने अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकबाकीच्या मालमत्ता करावरील शास्ती माफ करून करवसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला.
नगरपालिकेला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश –
शासनाने 100 टक्के व्याजमाफीला परवानगी दिली असून, यासाठी इंदापूर नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि नगरविकास विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
संघर्ष समितीचे योगदान –
या आंदोलनात समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, मार्गदर्शक हमीदभाई आत्तार, लेखक महादेव चव्हाण, संदिपान कडवळे, धरमचंद लोढा, अविनाश कोतमिरे, सागर गानबोटे, हाजी सलीमभाई बागवान, दादा पिसे, संतोष जामदार, अशोक ननवरे, भारत बोराटे, बाळासाहेब क्षिरसागर, रघुनाथ खरवडे, अर्जुन शिंदे, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, मल्हारी घाडगे आणि रुपेश सोनी यांचा सक्रिय सहभाग होता.
दरम्यान, इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे थकबाकीच्या मालमत्ता करावरील व्याज आणि शास्ती माफीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता इंदापूर नगरपालिकेने तातडीने प्रस्ताव पाठवून ही योजना लागू करावी, तसेच नागरिकांना व्याजाच्या रकमेचा परतावा किंवा समायोजन मिळावे, यासाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.





