विजय लाड कोयनानगर – संगमनगर (धक्का) ते पाटण या 13 किलोमीटरचा रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्य केला असून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी 212.49 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. डिसेंबरपर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कराड ते चिपळूण या राज्य मार्गावरील संगमनगर (धक्का) ते पाटण या 13 किलोमीटरचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. सात वर्षांपासून या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत असलेल्या या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 212 कोटी रुपये मिळावे, अशा मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सात महिन्यांपूर्वी दिला होता. दै. “प्रभात’ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्त्याच्या रखडलेल्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता दिली असून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी 212.49 कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी दिली. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असणारा हा रस्ता सोशल मीडियातून ट्रोल होऊन माध्यमांच्या बातमीचा विषय झाला होता. रस्ता रूंदीकरणाच्या कामात कराड ते विजयनगर हे काम पटकन पूर्णत्वास गेले. उर्वरीत पाटणपर्यंतचा रस्ता रडतखडत काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. पाटण ते संगमनगर (धक्का) या रस्त्याचे विकासक असणाऱ्या एल अँड टी कंपनीने रस्ता ठिकठिकाणी उकरुन हे काम अर्धवट अवस्थेत असताना हे काम करायला नकार दिला. त्यामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली. खड्ड्यामुळे चाळण झालेल्या या रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खड्डयात गेला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयांचा 2023- 24 या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा 16 ऑगस्ट रोजी मंजूर केला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री शंभुराज देसाई या राज्यमार्गासाठी आग्रही आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे या रस्त्याच्या विकासासाठी निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. महिनाभरात तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याबाबतची निविदा काढली जाईल. डिसेंबरपर्यंत हे काम केले जाईल.