Satara: भाजपचा स्वप्नभंग…
Satara अखेर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कारभारी निश्चित झाले. यापूर्वी बँकेच्या कारभारावर पूर्ण वर्चस्व आणि एकहाती नियंत्रण ठेवणार्या कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर बँकेचे नवे अध्यक्ष झाले आहेत, तर अलीकडील काळात बँकेतील राजकारणावर अंकुश ठेवणारे रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक व माजी आमदार दीपक चव्हाण बँकेचे उपाध्यक्ष झाले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र केलेली खेळी यशस्वी झाली आणि भाजपला रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मित्रपक्षांना यश आले. या दोन्ही पक्षांना पुढील काळात आपली ताकद वाढवण्यासाठी बळ मिळाले आहे.

Satara: जिल्ह्यात ‘हम करेसो कायदा’ अशा मस्तीच्या भावात अरेरावी करू पाहणार्या भारतीय जनता पक्षाला महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी जागेवर आणले आहे. येनकेनप्रकारेण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न अखेर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मित्रपक्षांनी धुळीस मिळवले. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवताना भाजपने केलेले डावपेच यावेळी चालू द्यायचे नाहीत, असे ठरवून या दोन्ही पक्षांनी त्यावेळचा वचपा काढला आहे. जिल्हा परिषदेचे राजकारण आणि प्रभाव ग्रामीण भागाशी निगडीत आहे. तशीच जिल्हा बँक ग्रामीण भागाशी आणि मुख्यत्वे शेतकर्यांशी निगडीत संस्था आहे. अर्थातच ग्रामीण भागाच्या आर्थिक नाड्या मजबूत करणार्या या संस्थेतून राजकारणाच्या नाड्याही आवळल्या जातात. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सत्तेच्या चाव्या कायम आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपच्या प्रयत्नांचा वारू काही काळासाठी तरी रोखला गेला आहे. अर्थातच संचालक मंडळातील सर्वाधिक जागा मिळवूनही अध्यक्षपदाची शर्यत हरण्यामागे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीचा भागही असू शकतो. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही निरोप असू शकतो, पण तूर्त तरी मित्रपक्षांनी दिलेला दणका भाजपला जिव्हारी लागणारा आहे…
अखेर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कारभारी निश्चित झाले. यापूर्वी बँकेच्या कारभारावर पूर्ण वर्चस्व आणि एकहाती नियंत्रण ठेवणार्या कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर बँकेचे नवे अध्यक्ष झाले आहेत, तर अलीकडील काळात बँकेतील राजकारणावर अंकुश ठेवणारे रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक व माजी आमदार दीपक चव्हाण बँकेचे उपाध्यक्ष झाले आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र केलेली खेळी यशस्वी झाली आणि भाजपला रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मित्रपक्षांना यश आले. या दोन्ही पक्षांना पुढील काळात आपली ताकद वाढवण्यासाठी बळ मिळाले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी भाजपने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आणि शिवसेनेच्या चार, अशा एकूण बारा जागांनी बँकेची सत्ता निश्चित केली. अर्थातच हे सत्तास्थान मिळवण्यासाठी भाजपने अखेरपर्यंत जीवाचा आटापिटा केला. अध्यक्ष-उपाध्यक्षपदापैकी एक तरी पद मिळावे, असे प्रयत्न झाले; पण राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद घेऊन, उपाध्यक्षपद शिवसेनेला दिले. जिल्हा बँकेत पूर्वीच्याच सुभेदारांच्या वारसांच्या ताब्यात बँक ठेवण्याचे काम करत, भाजपला बाजूला सारण्याची लढाई त्यांनी जिंकली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपला पुढे नेण्यासाठी मोठे प्रयत्न केले; परंतु वरिष्ठ पातळीवरुन म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेल्या निरोपामुळे त्यांच्या हालचालींवर काही मर्यादा आल्या. त्याच निरोपामुळे मकरंद पाटील व शंभूराज देसाई यांनाही बळ मिळाले, हे आता या निवडीमुळे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचा निरोप म्हणजे 2029 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. साम, दाम, दंड, भेद सार्याचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी बँक ताब्यात घेण्याचे राजकारणही केले असते; पण त्यांच्या निरोपातून त्यांच्या मुत्सद्दीपणाचा प्रत्यय आला आहे. कारण, बँक भाजपच्या ताब्यातही आली असती, पण लोकसभेला मकरदं पाटील व शंभूराज देसाई म्हणजेच युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर असलेच पाहिजेत, या दृष्टीकोनातून आलेल्या निरोपामुळे भाजपला नमते घेणे भाग पडले, असेच स्पष्ट झाले आहे. कारण, यापूर्वीच्या निवडणुकीत सातारा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निसटत्या मतांनी आला आहे, तर माढा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. हे लक्षात घेता 2029 च्या निवडणुकीत भाजपसाठी एकेक जागा महत्त्वाची ठरणार आहे. ही दूरदृष्टी दाखवून फडणवीसांनी चाणाक्षपणाही सिद्ध केला आहे. स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यायचा होता; परंतु गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यायचा, असे सांगितले गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा सल्ल्यानेच बँकेच्या सत्तेच्या चाव्या मित्रपक्षांकडे गेल्या. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवताना आक्रमक असलेले जयकुमार गोरे यावेळी तुलनेने आक्रमक नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली, तर भाजपचे निर्णय वरिष्ठ पातळीपासूनन ते बूथ पातळीपर्यंत कसे होत असतात, याचे उत्तर मिळते. प्रसंग आला की, भाजपन बँक नको, पण दोन खासदार हवे आहेत, हीच रणनीती सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या मैदानात अवलंबली.
स्थानिक पातळीवरील राजकारणात विधानसभा निवडणुकीपासून उचल खाल्लेल्या भाजपचा वारू काही प्रमाणात रोखण्याचे काम जिल्हा बँकेच्या निवडणुकीने केले आहे. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवताना 2029 जवळ आलेले नव्हते. काँग्रेसी विचारांचा जिल्हा पोखरण्याचे काम भाजपने केले. ते करताना स्वबळाची भाषा वापरत, मित्रपक्षांनाही शह द्यायचे त्यांचे धोरण बँकेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहिले; पण सातारा जिल्ह्यात या दोन्ही मित्रपक्षांनी स्वबळाचा मुद्दा भाजप बाजूला ठेवेल, अशी व्यवस्था करण्यास या निवडीत तूर्त तरी भाग पाडले आहे. जिल्हा बँकेतील या यशाचा फायदा लोकसभेसाठी भाजपला मिळेलही कदाचित; पण विधानसभेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपला फायदा करुन घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे संकेतच यानिमित्ताने मित्रपक्षांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांनाही दिले आहेत.
यशवंत विचारांची आठवण
जिल्हा बँकेने देशभरात मोठा नावलौकिक मिळवला आहे. यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक दिग्गजांनी या बँकेचा कारभार शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने प्रगतिपथावर ठेवला. त्याच विचारांच्या पठडीतील सर्वच पक्षांमधील नेत्यांनी सातारा जिल्ह्याचे पाणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवले आहे. भाजपचे सर्वाधिक नऊ संचालक असले, तरीही सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात राहिल्या आहेत. बँकेचे नेतृत्त्व करणारे कै. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या चिरंजीवांना अध्यक्ष करुन मकरंद पाटील यांनी ‘यशवंत’ विचारांची आठवण ताजी केली आहे, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड करुन रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण अजूनही सत्तेच्या पटावरील ‘किंगमेकर’ आहोत, हे सिद्ध केले आहे. असे असले तरी बँकेच्या सत्तास्थानासंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला गुलदस्त्यात आहे. त्यावरही पुढील राजकारण अवलंबून असेल.
मकरंद-शंभूराज युतीला रामराजेंची साथ (इथे छायाचित्र वापरावे)
भाजपने खेळलेला जिल्हा परिषदेचा डाव मित्रपक्षांचे नेते मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई विसरले नव्हते. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून निकालापर्यंत अतिशय शांत राहत, या दोन्ही नेत्यांनी आपले इप्सित साध्य केले आहे. याउलट जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे या निवडणुकीबाबत सातत्याने विधाने करत होते. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पूर्वसंध्येला शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, त्यांना रामराजेंनी दिलेल्या शुभेच्छा देतानाचे छायाचित्र बोलके तर ठरलेच. तेच निर्णायक होते, हे या निवडीतून सिद्ध झाले आहे. मकरंद पाटील-शंभूराज देसाई यांची युती आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची मुत्सद्देगिरी भाजपच्या स्वप्नांना ब्रेक लावून गेली.
बदलत्या सत्ताचक्राचे ‘हिरो’
पाटण तालुक्यात सातत्याने संघर्ष करुन राज्यपातळीवर आपल्या नेतृत्त्वाची धमक दाखवणारे शंभूराज देसाई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरले आहेत. 21 पैकी त्यांच्यासह शिवसेनेचे चारच सदस्य आहेत; परंतु बँकेचे उपाध्यक्षपद मिळवण्यात शिवसेनेला यश आले आहे. पाटण तालुक्यातून बँकेत निवडून येताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. देसाई घराण्यातील सदस्याचा 45 वर्षांनंतर बँकेत प्रवेश झाला. पाटण तालुक्यात पाटणकरांचे सत्ताचक्र भेदून, शंभूराज देसाई यांनी तालुक्यासह जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. एरवी तालुक्यापुरत्या सीमित राजकारणाला महत्त्व देणार्या शंभूराज देसाई ह आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकारण आणि एकूण जिल्ह्याच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा ठेवायला आता हरकत नाही. कारण, तालुक्यापासून जिल्हा पातळीपर्यंतचे सत्ताचक्र भेदण्यासाठी या ‘हिरो’ला आणखी बळ मिळाले आहे.




