Patan Landslide: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार धावल्या मदतीला; मृतांच्या वारसांना १२ लाखांची मदत जाहीर
Patan Landslide: आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून घटनास्थळाची पाहणी; पाटण गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार.

Patan Landslide – पाटण येथे मुसळधार डोंगरकडा कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत बाधित कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी शासनामार्फत तातडीची आर्थिक मदत जाहीर करत पाटण गावाच्या पुनर्वसनाबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. या दुर्घटनेत नंदू तिकोणे, अनिता तिकोणे आणि त्यांचा वर्षभरापूर्वी विवाह झालेला मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्ञानेश्वर तिकोणे यांच्या गर्भवती पत्नीची भेट घेऊन धीर दिला. मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये या प्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरड कोसळून पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या घरासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ती लवकरात लवकर वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
तसेच दरडीमुळे अंशतः नुकसान झालेल्या इतर कुटुंबांनाही शासनाकडून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी दुर्घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाटण गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दीपक हुलावळे, सुरेंद्र नवले, दीपाली हुलावळे, संतोष राऊत, पल्लवी दाभाडे, सुनीता येवले, साहेबराव कारके, विक्रम देशमुख, शैला कालेकर, सुवर्णा राऊत आदी उपस्थित होते.





