खालापूर : तालुक्यातील खोपोली शहरासह परिसरात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने शुक्रवारी (दि. २५) सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर खोपोली, खालापूर आणि परिसरात मुसळधार पावसाचा जोर वाढत असून, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खोपोली शहर घाटमाथ्याच्या पायथ्याशी असल्याने डोंगरांवरून वाहणारे लहान-मोठे धबधबे, झरे यांचे पाणी पाताळगंगा नदीत मिळत असल्याने पूराचा धोका अधिकच वाढला आहे. जुना पुणे – मुंबई महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून, खोपोलीतील युनिमाऊंट सोसायटी परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने बंद पडली असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. कर्जत-खोपोली रेल्वेमार्गावर केळवली ते लौजी गाव दरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोपोली शहरातील लौजी, श्रीरामनगर, चिंचवली डिपी, शिळफाटा परिसरातील डीसी नगर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दरडधोक्याच्या सुभाषनगर वसाहतीमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही दरड कोसळण्याच्या अवस्थेत असूनही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पुलावरून ओसंडून वाहणारे पाणी पाताळगंगा नदीवरील खालापूर-सावरोली जोड पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे, त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. काही नागरिक मात्र जीव धोक्यात घालून पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहे. आपत्कालीन यंत्रणा तैनात खालापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदत कार्य सुरू असून, नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहावं, आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन तहसील कार्यालय आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.