मुंबई – रेल्वे प्रवास करताना सर्वांनाच सावधानतेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र अजुनही काही लोक धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये वयोवृद्ध देखील धावत्या रेल्वेत चढण्याची हिंमत करताना दिसतात. कल्याण स्थानकावर देखील असाच काहीसा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये एक 79 वर्षांचा वृद्ध प्रवासी अडकला होता. कल्याण स्टेशनवर 29 जानेवारीला ही घटना घडली आहे. तिकडे उपस्थित असलेल्या एका आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला आहे. आपला जीव वाचविल्या बद्दल या प्रवाशाने आरपीएफ जवानाचे आभार मानले.
धावत्या रेल्वेत चढताना अडकला प्रवासी; RPF जवानाने केली कमाल ! थरार कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/V0H0Ox0ssW
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 30, 2021
शुक्रवारी दिल्लीला जाणारी पंजाब मेल रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकात चार नंबर प्लॅटफॉर्मवर आली. दिल्लीतील रहिवासी असलेल्या प्रवासी मासुर बफुर अहमद यांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरल्याने ते फलाट आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये पडले, यावेळी फलाटावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान एस पी यादव आणि जितेंद्र गुजर यांनी तात्काळ धाव घेत मसूर यांना फलाटावर ओढून घेत त्यांचा जीव वाचवला. हा थरार स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.