पुणे : पासोड्या विठोबा मंदिर चोरी प्रकरण उघडकीस…

पुणे(प्रतिनिधी) – बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यातील त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ताब्यात घेतलेला मुलगा आणी त्याचा मित्र पदपथवार रहातात. तो झोपलेला असताना, त्याच्या मित्राने त्याला उठवून मंदिरापाशी आणले होते. यानंतर दोघांनी मिळून मंदिराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. मंदिरातील दान पेटी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने उघडली.
यानंतर त्यातील 1400 रुपये चोरुन नेले. चोरी केल्यावर त्याचा मित्र पळून गेला, हा मात्र नेहमीच्याच जागेत पदपथावर जाऊन झोपला होता. संबंधीत मुलगा फिरस्ता असून मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करतो. त्याला अंमलीपदार्थाचे व इतर कोणतेही व्यसन नाही. चोरलेले पैसे दोघांनी खर्च केल्याचे तो सांगतो. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील करत आहेत.





