धर्माच्या आधारावर झालेली फाळणी ही ऐतिहासिक चूक : राजनाथ सिंह

नवी दिल्ली – 20 व्या शतकातील दोन महायुद्धांनंतर जगातील सर्वात निर्णायक युद्धांपैकी एक असे 1971 ला लढले गेले. या युद्धाने धर्माच्या आधारावर भारताची झालेली फाळणी ही ऐतिहासिक चूक असल्याचे अधोरेखित केले, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.
1971 च्या भारत-पाक युद्धात बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी,सशस्त्र दलांनी दाखवलेले शौर्य आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करणारा कार्यक्रम स्वर्णिम विजय पर्व या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन राजनाथसिंह यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे; हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार;संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, सचिव (माजी सैनिक कल्याण) बी आनंद, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) संजीव मित्तल; संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी; राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी ) छात्र आणि सामान्य नागरिक या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते.
दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल ज्या युद्धातील विजयाने बदलला त्या 1971 च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या गौरवशाली विजयाचे स्मरण करणारे “स्वर्णिम विजय पर्व’ हा एक उत्सव असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले.
1971 च्या युद्धात विजय सुनिश्चित करणारे शूर भारतीय सैनिक, नौसैनिक आणि हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आदरांजली वाहिली आणि ते म्हणाले की, त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल देश सदैव ऋणी राहील. 1971 च्या विजयाच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ताज्या आहेत आणि त्या आठवणींचा हा उत्सव आहे. त्याच वेळी,हे पर्व 1971 च्या युद्धात आपल्या सैन्याने दाखवलेला आवेश, धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. याच आवेशाने आणि हिरिरीने देशाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची आणि लष्करी व्यवहार विभागाची निर्मिती या काही सुधारणा असून या सुधारणा सशस्त्र दलांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करतील.खरेदीपासून उत्पादनापर्यंत, सशस्त्र दलांना अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.संरक्षण संशोधन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हा कार्यक्रम स्वर्णीम विजय मशालीच्या वर्षभराच्या प्रवासाचा अंतिम टप्पा असेल. संपूर्ण देशात प्रवास करून युद्धातील शूर सैनिकांच्या गावातील माती संकलित केलेली स्वर्णीम विजय मशाल 16 डिसेंबर 2021 रोजी एका भव्य समारंभात नवी दिल्लीत एकत्र येईल.





