Parth Pawar : पार्थ पवारांचा राज्यसभा प्रवेश निश्चित! PM मोदी आणि DCM सुनेत्रा पवार यांच्यात 40 मिनिटे खलबते; भाजपचा ‘ग्रीन सिग्नल’
Parth Pawar : भाजप नेतृत्वाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे, अशा चर्चा रंगत आहेत.

Parth Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, सत्तासमीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी पार्थ पवार यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.
पंतप्रधान मोदींकडून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा –
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी पुत्र पार्थ आणि जय पवार यांच्यासह राजकीय गाठीभेटी सुरू केल्या. संसदेत पंतप्रधान मोदींसोबत त्यांची सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधानांनी अजित पवार यांच्या योगदानाचे स्मरण करत शोक व्यक्त केला. तसेच, ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून भाजप खंबीरपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar जी यांची भेट झाली.
आपले सर्वांचे लाडके स्व. अजित पवार जी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे सहज शक्य नाही. परंतु, जनकल्याण आणि राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपल्या… pic.twitter.com/H1JeFhFv0J
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2026
पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी?
पंतप्रधानांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या अर्ध्या तासाच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. भाजप नेतृत्वाने पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे, अशा चर्चा रंगत आहेत. तूर्तास सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या जागेवर पार्थ पवार यांना घेतले जाईल, अशी रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम –
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (अजित पवार आणि शरद पवार गट) पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, दिल्लीतील या हाय-व्होल्टेज बैठकांनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आपली स्वतंत्र ओळख टिकवून भाजपसोबतची युती अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे.
सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार?
अजित पवार यांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या महिनाभरात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’पदी अधिकृत निवड होण्याची दाट शक्यता आहे. या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक प्रबळ होताना दिसत आहे.





