Parth Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलथापालथी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता पुढील राजकीय गणिते वेगाने बदलू लागली आहेत. सध्या राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार, विधिमंडळाच्या सदस्य होईपर्यंत खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे संकेत आहेत. मात्र, आमदारकीसाठी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता प्रबळ असून, त्यानंतर राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेसाठी पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. २०१९ चा पराभव आणि राजकीय बॅकफूट पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्या पराभवानंतर पार्थ यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यावेळी पार्थ यांना उमेदवारी देण्यास शरद पवार यांचा विरोध होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार नकोत, असा स्पष्ट संदेश देत शरद पवार यांनी स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती. ‘नातवाच्या मताला कवडीचीही किंमत नाही’ २०१९ नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्याच काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण गाजले. या प्रकरणात CBI चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना “माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, असे शरद पवार यांनी ऑगस्ट २०२० मध्ये स्पष्ट शब्दांत म्हटले होते. साडे पाच वर्षांत बदललेलं राजकीय गणित आता साडे पाच वर्षांनंतर चित्र पूर्णपणे बदलले आहे. शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत असून, ते पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याइतकं संख्याबळही उरलेले नाही. विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे केवळ १० आमदार आहेत. दुसरीकडे, त्याच शरद पवारांचे नातू पार्थ पवार मात्र अगदी सहज राज्यसभेवर जाण्याच्या स्थितीत आहेत. २ एप्रिलच्या निवडणुकीत काय होणार? येणाऱ्या २ एप्रिलला महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांची टर्म संपत आहे. यामध्ये शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, भागवत कराड, रामदास आठवले आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे. महायुतीकडे विधानसभेत सध्या २३० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसह मतदान झाल्यास एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३३ पहिल्या पसंतीची मतं लागतील. या गणितानुसार, भाजपचे ४ उमेदवार, शिवसेनेचा १ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) १ उमेदवार निवडून येऊ शकतो. याच समीकरणात पार्थ पवारांचा राज्यसभेतील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. शरद पवार – पार्थ पवार आजोबा बाहेर, नातू आत? ज्या शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत असंख्य नेते घडवले, आमदार-खासदार केले, त्यांचाच पक्ष आज अत्यंत अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे, कधीकाळी ‘इममॅच्युअर’ ठरवले गेलेले पार्थ पवार आता संसदेच्या वरच्या सभागृहात जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. राजकारणात नशिबाचे फासे कधी फिरतील, सांगता येत नाही आणि सध्या तरी आजोबा आऊट, नातू इन अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.