बोगद्याचा काही भाग अचानक कोसळला अन् घडली दुर्घटना; आठ कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Telangana Tunnel Collapse | तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यात शनिवारी एका बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. श्रीशैलम बोगदा कालवा प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळल्याने आठ कामगार आत अडकले आहेत. यात दोन अभियंते, दोन ऑपरेटर आणि चार कामगारांचा समावेश आहे.
साधारण 14 किमी आत अडकलेल्या या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व कामगार उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. बचाव कार्यादरम्यान अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या लष्करी इंजिनिअर टास्क फोर्स (ETF) ने तातडीने मदतीसाठी पथक पाठवले आहे. बचाव पथक बोगद्याच्या आत जाण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. जेणेकरून आतील भागाचा आढावा घेतला जाईल.
तेलंगणाचे सिंचन मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितले की, ‘राज्य सरकारने बचाव कार्यासाठी देशातील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. यामध्ये उत्तराखंडमध्ये याच प्रकारच्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढणाऱ्या तज्ज्ञांचाही समावेश आहे. तसेच, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक आणि लष्कराच्या सहकार्याने बचाव कार्य वेगाने सुरू आहे.’
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य जलद आणि प्रभावी करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच, केंद्र सरकारकडून बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
नेमकं काय घडलं?
शनिवारी सकाळी टनल बोरिंग मशीनसह बोगद्यात 50 हून अधिक लोक काम करत होते. ते बोगद्यात 13.5 किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. यादरम्यान बोगद्यात पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने बोगद्याच्या छताचा भाग कोसळला. यादरम्यान मशीनच्या पुढे असलेल्या दोन इंजिनियरसह सहा मजूर अडकले. तर 42 कर्मचारी बोगद्याच्या बाहेरच्या दिशेने धावले आणि सुरक्षित बाहेर पडले.
दरम्यान, हा बोगदा नलगोंडा जिल्ह्यातील ४ लाख एकर शेतजमिनीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी बांधला जात आहे. या ४४ किमी लांब बोगद्याच्या ९.५ किमी भागाचे खोदकाम अद्याप बाकी आहे. सध्या बोगद्याच्या आत जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा:





