Newasa News : खेडले परमानंद येथील अंगणवाडी छताचा भाग कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

नेवासा : नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील गावठाण हद्दीतील असणाऱ्या अंगणवाडीतील खोलीच्या छताचा काही भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे. गुरुवार (दि.९) रोजी नेहमी प्रमाणे पालक आपल्या मुलांना शाळेत सोडून गेले. थंडीचे दिवस असल्याने मुले बाहेर अंगणात बसलेले होते. अचानक अंगणवाडी आतमध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला.
अंगणवाडी सेविकेने आतमध्ये डोकावून बघितले तर समोरचे दृष्य बघून क्षणभर पायाखालची जमीनच सरकली. इमारतीच्या छतावरील काही भाग कोसळलेला होता. सुदैवाने चिमुकले बाहेर असल्यामुळे प्रसंग टळला. सन.२०११ साली या इमारतीचे काम झालेले आहे. छतावरील काम तत्कालीन संबंधित ठेकेदारांने अपुर्ण अवस्थेत आजपर्यंत ठेवले असल्याची बाब या घटनेने उघडकीस आली तर वरील बाजूस काम करण्यासाठी वाळू साठवून ठेवलेली होती त्यामुळे पाणी साचून वरील छत ढिसाळ झालेले बोलले जात आहे.
आधीच कामाचा दर्जा निकृष्ठ अन् त्यामुळे अक्षरशः या चिमुल्यांसाठी काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती म्हणून दुर्देवी घटना टळली. त्यामुळे विद्यार्थी बालचिमुकले या घटनेतून सुखरुप वाचलेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून छतावर पाणी साचते दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी काम सुरू झाले होते पण का बंद पडले हे मात्र आजही गुपीत आहे.
हा प्रकार होऊन सुध्दा कुणाला त्याचे काही सोयरसुतक नाही. तत्कालीन ठेकेदार कोण होता, तसेच त्याने हे काम अपुर्ण अवस्थेत का ठेवले? त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी काय झोपेत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





