Parliament Monsoon Session: ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिले उत्तर

Parliament Monsoon Session: लोकसभेत सोमवारी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी विरोधकांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर दिले. विरोधकांनी वारंवार विचारले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवरील हल्ले का थांबवले? यावर राजनाथ सिंह म्हणाले, “भारताने आपले उद्दिष्ट साध्य केले होते.”
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर:
राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. “आमच्या सशस्त्र दलांनी कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताची कारवाई ‘स्वसंरक्षणासाठी’:
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारताची कारवाई ही ना भडकावू होती, ना विस्तारवादी, तर पूर्णपणे “स्वसंरक्षणासाठी” होती. तरीही, १० मे २०२५ रोजी पहाटे १:३० वाजता पाकिस्तानने मिसाइल, ड्रोन, रॉकेट आणि इतर लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करत भारतावर मोठा हल्ला केला.‘
आजचा भारत वेगळा विचार करतो’:
लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “आजचा भारत वेगळा विचार करतो आणि वेगळ्या पद्धतीने काम करतो. जेव्हा तुमचा विरोधी दहशतवादाला आपली रणनीती बनवतो आणि चर्चेची भाषा समजत नाही, तेव्हा ठाम राहणे आणि निर्णायक होणे हाच एकमेव पर्याय आहे.”
‘आमचे सशस्त्र दल सिंह आहेत’:
युद्ध समान स्तरावरील शत्रूंविरुद्ध असावे, असे सांगताना राजनाथ सिंह यांनी गोस्वामी तुलसीदास यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “प्रेम आणि शत्रुत्व समान स्तरावर असावे. जर सिंहाने बेडकाला मारले, तर तो चांगला संदेश देत नाही. आमचे सशस्त्र दल सिंह आहेत.”
“Today’s India thinks differently and works differently. We believe that when your adversary has made terrorism a strategy and does not understand the language of dialogue, then standing firm and being decisive is the only option,” says Defence Minister Rajnath Singh during the… pic.twitter.com/hELT93zTwt
— ANI (@ANI) July 28, 2025
‘धर्माच्या आधारावर लोकांची ओळख’:
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला अमानवीयतेची पराकाष्ठा ठरवत राजनाथ सिंह म्हणाले की, हल्लेखोरांनी लोकांची ओळख त्यांच्या धर्माच्या आधारावर केली आणि त्यांना लक्ष्य केले.
‘सैन्याने घेतला बदला’:
संरक्षणमंत्री म्हणाले, “आमच्या देशातील माता-भगिनींच्या सिंदूराचा बदला सैन्याने घेतला आहे. हे सिंदूर आता केवळ प्रतीक नसून शौर्याची गाथा बनले आहे.”





