parliament monsoon session 2025 : मतदार याद्यांवरुन गदारोळ ! सलग तिसऱ्या दिवशी कामकाज तहकुब

parliament monsoon session 2025 – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. बिहार विधानसभा मतदार याद्यांच्या पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे खासदार जोरदार घोषणाबाजी करत हौद्यामध्ये उतरले. त्यांनी सरकारचा निषेध करत काळे कपडे हवेत झळकावले. यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी सभागृहात गोंधळ उडाला.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना घोषणाबाजी न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, रस्त्यावर ज्या पद्धतीने विरोधी घोषणा दिल्या जातात तसा व्यवहार संसदेत करता येणार नाही. देशातील नागरिक हे सर्व पाहात आहेत. यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरु होता, त्यानंतर लोकसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सुरुवातीला दुपारी 12 पर्यंत आणि नंतर दुपारी 2 पर्यंत कामकाज स्थगित केले गेले.
बिहारमध्ये मतदार यादी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) मुद्यावर संसदेच्या प्रवेशद्वारावर विरोधी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या आंदोलनात आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, शिवसेना (ठाकरे) संजय राऊत, जया भादुरी-बच्चन देखील होते.
आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संबंधी घटनात्मक आणि निवडणुकी संबंधी चर्चेच्या प्रस्तावाची नोटीस दिली आहे. त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी केवळ बिहारपुरतेच नव्हे, तर देशातील इतर राज्यांतील मतदार याद्यांवरील प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, बिहारच्या मतदार याद्यांवरील गोंधळ आता संसद आणि संसदबाहेरही पेटला आहे. विरोधकांनी या मुद्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.





