Parle Biscuit Price: सर्वांच्या आवडीचे पार्ले बिस्किट महागणार? किंमत वाढीचे ‘हे’ आहे कारण

Parle Products Price Hike Soon: सकाळचा नाश्ता असो अथवा सायंकाळचा चहा, यासोबत पार्ले-जी बिस्किट हवाच असतो. बिस्किटाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरीही आजही अनेकजण 5 रुपयांचा पार्ले-जी आवडीने खातात. मात्र, आता सर्वांच्या आवडत्या पार्ले कंपनीच्या बिस्किटाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी पारले प्रोडक्ट्स जानेवारी 2025 पासून आपल्या सर्व उत्पादनांच्या किंमतीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. पार्ले-जी बिस्किट, चॉकलेट, स्नॅक्स आणि इतर वस्तूंवर या किंमतीचा परिणाम पाहायला मिळेल. किंमतीतील हे बदल जानेवारी 2025 पासून पाहायला मिळू शकतात.
रिपोर्टनुसार, पार्ले प्रोडक्ट्सकडून सर्वात कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या पार्ले-जी बिस्किटाच्या वजनात देखील बदल केला जाण्याची शक्यता आहे. पार्ले-जी बिस्किटाच्या पॅकेटचे वजन 5 ते 10 टक्के कमी केले जाऊ शकते. कंपनीच्या इतर बिस्किटांच्या पॅकेट्सचे वजनही कमी केले जाण्याची शक्यता आहे. 0 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या उत्पादनांवरच या किंमत वाढीचा परिणाम पाहायला मिळू शकतो. कच्चा मालाच्या वाढत्या किंमती आणि पाम ऑइलवरील वाढलेले अतिरिक्त शुल्क हे किंमत वाढ व पॅकेट्सच्या बदलत्या वजनाचे कारण सांगितले जात आहे.
कच्चा मालाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्यांना वस्तूंच्या किंमती वाढवाव्या लागत आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी सरकारकडून पाम ऑइलच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ब्रिटानियाकडून देखील वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब्रिटानियापाठोपाठ आता पार्ले-जी देखील किंमतीत बदल करणार आहे.
दरम्यान, पार्ले प्रोडक्ट्सचा सर्वात लोकप्रिय उत्पादन पार्ले-जी बिस्किटाची किंमत गेली अनेक वर्षांपासून समानच आहे. 1994 पासून या बिस्किटाची किंमत फक्त 4 रुपये होते. 2021 मध्ये यात 1 रुपयांनी वाढ करण्यात आली. कंपनीने बिस्किटाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नसली तरीही ठराविक टप्प्याने पॅकेटचे वजन कमी केले आहे.





