India At Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतासाठी संमिश्र बाब होती. भारतीय खेळाडूंनी येथे एकूण 6 पदके जिंकली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 117 भारतीय खेळाडू पॅरिसला पोहोचले होते. एकूण 6 पदके भारताच्या खात्यात आली, तर 7व्या पदकाचा निर्णय अजून यायचा आहे.
वास्तविक, विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर तिने रौप्य पदकासाठी अपील दाखल केले आहे, ज्याचा निर्णय येणे बाकी आहे. हा निर्णय विनेशच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात एकूण 7 पदके जमा होऊ शकतात.
भारताने 6 पैकी 5 कांस्य आणि 1 रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. मात्र, यावेळी भारताच्या खात्यात एकही सोने आले नाही. यापूर्वी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्येही भारताने 1 सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 7 पदके जिंकली होती, जी भारताची एका ऑलिम्पिकमधील सर्वोच्च संख्या होती. आता महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयानंतर भारताला 7 वे पदक मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Thanks to Aman Sehrawat’s historic #Bronze🥉win, we have a total of 6⃣ medals at the #ParisOlympics2024!!
Congratulations to our brave contingent who gave their all at the French capital. Let’s hear it out for all the participants and #Cheer4Bharat🇮🇳🥳 pic.twitter.com/LQhkqx1jVk
— SAI Media (@Media_SAI) August 11, 2024
पॅरिसमध्ये भारताने कोणत्या खेळात जिंकली पदके ?
1. मनू भाकर (10 मीटर एअर पिस्तूल) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकल स्पर्धेत भारताला पहिले पदक (कांस्य) मिळाले. मनू भाकरने भारतासाठी हे पदक जिंकले होते. मनू भाकरने एकूण दोन पदके जिंकली होती. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दुसरे पदक जिंकले. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात मनूने निराशा केली, जिथे ती चौथ्या स्थानावर राहिली. अशाप्रकारे मनूचे तिसरे पदक हुकले होते.
2. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग (10 मी एअर पिस्तूल मिश्र संघ) : भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र (कांस्य) संघात दुसरे पदक मिळाले. भारताला दुसरे पदक मिळवून देणाऱ्या या संघात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा समावेश होता.
3. स्वप्नील कुसाळे (50 मीटर रायफल 3 पी) : नेमबाजीत भारताला तिसरे पदक (कांस्य) मिळाले. स्वप्नीलने 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील पहिला भारतीय ठरला.
4. हॉकी संघ : भारतीय हॉकी संघानेही कांस्यपदक पटकावले. हॉकी संघाने भारताच्या खात्यात चौथे पदक जमा केले. कांस्यपदकाच्या लढतीत हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला होता.
5. नीरज चोप्रा (भालाफेक) – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भारताला पाचवे पदक मिळवून दिले होते. नीरजने भालाफेकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
6. अमन सेहरावत (कुस्ती) : भारताच्या खात्यात सहावे पदक कुस्तीपटू अमन सेहरावतने पटकावले. अमनने कुस्तीच्या 57 किलो गटात कांस्यपदक जिंकले.