Paris Olympics 2024 (Hockey) : हाॅकीमध्ये टीम इंडियाची कांस्य भरारी…

Paris Olympics 2024 (Hockey) : भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि कांस्यपदक जिंकले आहे. गुरूवार 8 ऑगस्ट रोजी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. याआधी संघानं टोकियो ऑलिम्पिक गेम्समध्येही कांस्यपदक जिंकले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे चौथे कांस्यपदक ठरले. यापूर्वी भारताची तिन्ही कांस्यपदके नेमबाजीत आली होती. दरम्यान, भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात 13 वे पदक जिंकले आहे. भारताने आतापर्यंत विक्रमी 8 सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत. 1968 आणि 1972 नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करत भारताला स्पेनविरुद्ध आघाडी मिळवून दिली जी अखेरीस निर्णायक ठरली. भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला कांस्यपदक जिंकत विजयी निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिला आहे.
𝐌𝐞𝐝𝐚𝐥 𝐀𝐚 𝐆𝐲𝐚 𝐉𝐢, 𝐂𝐡𝐚𝐤 𝐃𝐞 𝐏𝐡𝐚𝐭𝐭𝐞!😎💪🏻#TeamIndia🏑 enter history books at the French capital as they claim their second consecutive #Olympic #Bronze🥉at #Paris2024🥳
The #MenInBlue prevailed 2-1 over Spain🔥to claim the medal!!
India,🇮🇳 how’s the Josh?… pic.twitter.com/jd8mBC7cx8
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2024
आजच्या कांस्यपदकाच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनच्या संघाने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताविरुद्ध 1-0 ने आघाडी घेतली. स्पेनच्या मार्क मिरालेसने खेळाच्या 18व्या मिनिटाला हा गोल केला. त्यानंतर लगचेच दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन मिनिटांचा खेळ बाकी असताना स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने ही संधी हाणून पाडली. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसरा क्वार्टर संपण्याच्या काही सेकंद आधी 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमधील सामना 1-1 असा बरोबरीत होता.
यानंतर हरमनप्रीत सिंगने तिसऱ्या क्वार्टर सुरू झाल्यानंतर लगेगच म्हणजे 33 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. खेळाचा तिसरा क्वार्टर संपेपर्यत भारतीय संघ 2-1 ने पुढे होता. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. खेळाच्या शेवटच्या मिनिटांत स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, पीआर श्रीजेशने गोलपोस्टवर शानदार सेव्ह करत ही संधी हाणून पाडली आणि स्पेनला बरोबरी करण्यापासून रोखले. या चमकदार कामगिरीनंतर पीआर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा केला आहे.
Paris Olympics 2024 : विनेश तू एक खरी योद्धा आहेस – अभिनव बिंद्रा
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टीम इंडियाची कामगिरी
1. पहिला सामना : न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव
2. दुसरा सामना : अर्जेंटिनाबरोबर 1-1 ने बरोबरी
3. तिसरा सामना आयर्लंडचा 2-0 असा पराभव
4. चौथा सामना : बेल्जियमविरुद्ध 2-1 ने पराभूत
5. पाचवा सामना : ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव
6. उपांत्यपूर्व फेरी : ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव
7. उपांत्य फेरी : जर्मनीविरूध्द 2-1 पराभूत
8. कांस्यपदक सामना – स्पेनचा 2-1 पराभव





