Paris Olympics 2024 (Athletics) : अविनाश साबळेचेही पदक हुकले, अंतिम फेरीत 11व्या स्थानावर…

Paris Olympics 2024 (Athletics, 3000M Steeplechase Race,Avinash Sable ) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताचा 12 वा दिवस होता आणि पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत प्रकारातून भारतासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताचा धावपटू अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत 11 व्या स्थानावर राहिला. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशांना आणखी एक धक्का बसला आहे.
भारतीय खेळाडू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकू शकला नाही. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीत सहभागी झालेला अविनाश साबळे या शर्यतीत टॉप-10 मध्येही स्थान मिळवू शकला नाही. भारतीय स्टार खेळाडूने 8:14.18 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली आणि यासह तो 15 रेसर्समध्ये 11 व्या स्थानावर राहिला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये, त्याने पात्रतामध्ये 8:18.12 मिनिटांसह तत्कालीन राष्ट्रीय विक्रम केला होता परंतु अंतिम फेरीत तो पोहोचू शकला नव्हता. या अर्थाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये साबळेचे अंतिम फेरीत पोहोचणे केवळ ऐतिहासिकच नाही तर मागील ऑलिम्पिकपेक्षाही चांगली कामगिरी ठरली आहे.
मोरोक्कोच्या सुफयान अल बक्कलीने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. बक्कलीने गेल्या ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण जिंकले होते आणि सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याने आपली शर्यत 8:06.05 मिनिटांत पूर्ण केली. अमेरिकेच्या केनेथ रुक्सने रौप्यपदक तर केनियाच्या अब्राहम किबिवोटने कांस्यपदक जिंकले.
तत्पूर्वी, भारताचा अविनाश साबळे याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या पहिल्या फेरीत 8:15.43 अशी वेळ नोंदवत पाचवे स्थान मिळवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. यासह अविनाश ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 300 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला होता.
8:15.43 ही अविनाश साबळे याचे सर्वोत्तम कामगिरी नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पॅरिस डायमंड लीगमधील शर्यत त्याने 8 मिनिटे आणि 09.91 सेकंदात पूर्ण केली होती, जी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.





