Parbhani News : परभणीच्या घटनेचे धुळ्यात पडसाद ! एसटीवर करण्यात आली दगडफेक

धुळे : परभणी येथील घटनेचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह बीड, नांदेड, लातूर, यवतमाळमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागल आहे.
धुळ्यात एसटीवर दगडफेक
परभणीच्या घटनेचे पडसाद धुळ्यात देखील उमटल आहेत. धुळे शहरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. नाशिक शहादा बसवर दगडफेक करण्यात आली आहे. धुळे शहरातील दसरा मैदान चौकात ही घटना घडली आहे. दगडफेकीच्या या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात पाच ते आठ जणांकडून दगडफेक झाल्याचा दावा चालकाकडून करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला.
तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणार असून त्या रिपोर्टची सर्वांना प्रतीक्षा आहे.
कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या
परभणीमध्ये संविधानाच्या विटंबना करण्याच्या प्रकारानंतर जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ऑल इंडिया पँथरचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांच्याकडून करण्यात आली आहे.





