Paris Paralympics 2024 (Javelin Throw) : नवीन विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकण्याचे ध्येय – सुमित अंतिल

Paris Paralympics 2024 (Sumit Antil) : – सरावात नेहमीच सातत्य ठेवताना तंत्रात देखील कोणताच बदल केलेला नाही. यावेळी केवळ ताकद आणि मजबुती वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गतवेळी केलेल्या विक्रमाला मागे टाकून नवीन विक्रम करण्याचा मनसुबा टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता दिव्यांग भालाफेकपटू सुमित अंतिल याने व्यक्त केला. सुमितला दिव्यांग खेळाडूंमधला नीरज चोप्रा असे म्हटले जाते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा व टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिल या दोन्ही भालाफेकपटूंनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
२८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पॅरिस येथे पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा सुमित अंतिल, गोळा फेकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी भागश्री जाधव हे भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहेत.
सुमितने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ३ वेळा विश्व विक्रमाची नोंद करताना ६८.५५ मीटरच्या भालाफेकीसाठी सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर झालेल्या २०२३ च्या पॅरा वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये देखील ७०.८३ मीटरची भालाफेक करताना नवीन विश्व विक्रम बनविला होता. हांगझोऊ येथे पॅरा आशियाई खेळाममध्ये स्वतः:चाच विक्रम मोडताना ७३.२९ मीटरची भालाफेक करून सुवर्ण कामगिरी बजावली होती. सुमित पॅरामध्ये एफ ६४ या गटात खेळतो. शरीराचा खालचा भाग दिव्यांग असलेला खेळाडू कृत्रिम पायाच्या साहाय्याने उभा राहात असेल तर त्याचा समावेश या गटात करण्यात येतो.
१७ व्या वर्षी सुमितला एका अपघातात पाय गमवावा लागला होता. त्यानंतर भालाफेकीत या २६ वर्षांच्या खेळाडूने अनेक कीर्तिमान आपल्या नावावर केले आहेत. मला भालाफेकीत ८० मीटरपर्यंत भालाफेक करायचे माझे लक्ष्य आहे. मात्र पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळामध्ये मी ७५ मीटरची दुर भालाफेक करताना सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सुमितने बोलताना सांगितले.
पॅरिसमधील परिस्थिती वेगळी..
उद्घाटन सोहळ्यासाठी सुमित आणि भाग्यश्री जाधव हे भाराताचे ध्वजधारक असणार आहेत. आताच्या घडीला आमच्यावर कोणतेच दडपण नाही. मात्र पॅरिस येथे गेल्यानंतरच तेथील परिस्थिती काय आहे, याबाबत माहिती मिळणार आहे. देशात जेव्हा तुम्ही खेळाता, तेव्हा परिस्थिती वेगळी असते. मात्र विदेशात गेल्यानंतर तेथील परिस्थिती अनेकदा विपरीत देखील असू शकते. काहीही झाले तरी या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याचा निर्धार सुमितने बोलून दाखविला.
Tokyo Paralympics : देशवासियांची मान उंचावली; भालाफेकमध्ये विश्वविक्रमासह सुमितचा सुवर्णवेध
म्हणून मी स्पर्धा कमी खेळतो…
पॅरालिम्पिक सारख्या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करणे ही एक वेगळी भावना आहे. मी पहिल्यांदाच उदघाटन सोहळ्यात ध्वजवाहकाची भूमिका निभावणार आहे. टोकियो पॅरालिंपिकच्या वेळी कोविडमुळे अनेक बंधने होती. स्पर्धेला देखील शेवटच्या टप्प्यात आम्ही पोहचलो होतो. मात्र त्यानंतर मी जास्त स्पर्धामध्ये खेळलो नाही. मी स्पर्धा खेळण्यापेक्षा सराव आणि अभ्यास जास्त करण्यावर भर देतो. भारताला सुवर्णपदक मिळवून द्यायचे या एका गोष्टीकडे मी जास्त लक्ष देत असल्याचे सुमितने सांगितले.
नीरजने सुवर्णपदक जिंकायला हवे होते..
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने विक्रम करताना सुवर्णपदक जिंकले होते. भारताचा अव्वल भालाफेकपटू असणाऱ्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नीरजने सुवर्णपदक जिंकावे अशी सर्वांची भावना होती. मात्र, अनेकदा एखादा दिवस तुमचा नसतो. टोकियोमध्ये दोन्ही दिवस आमचे होते. नीरजने केलेल्या कामगिरीचे निश्चित समाधान असल्याचे सुमितने सांगितले.





