पुणे | जानकरांबाबत जबाबदारी दिल्यास निभावेन- पंकजा मुंडे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याच्या वरिष्ठ नेत्यांवर युतीबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडून पक्षाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. पक्षाने मला जानकरांबाबत जबाबदारी दिल्यास मी ती निभावू शकते. मात्र, मला आता लोकसभेची उमेदवारी दिली असून, मी सध्या त्या कामात आहे, असे भाजपच्या बीड लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पुण्यात मोहोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच एकच चर्चा रंगली होती, तसेच जानकर महायुतीत गेले नाहीत, तर माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे,
तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनीही पंकजा मुंडे या त्यांच्या बहीण आहेत. त्या बघून घेतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. स्वत: जानकर यांनी माझी बहीण मोठी झाली आहे. तिला कुठे थांबायचे हे समजते, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याच्या वरिष्ठ नेत्यांवर युतीबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महादेव जानकरांबाबतची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली, तर मी ती जबाबदारी निभावणार. कोणाला सोबत घ्यायचे हे वरिष्ठ नेते ठरवणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी या वेळी स्पष्ट केले, तसेच पाटील यांनी याबाबत मान दिला त्यांचे आभार मानते, असे सांगत मी आधीपासूनच हुशार आहे, असे सांगत जानकरांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली.
मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चाचे सहकारी असून, गोपीनाथ मुंडे यांचेही जवळचे होते. पुणे शहराच्या समस्या मांडण्यासाठी चांगला खासदार मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.




