Pankaja Munde Speech | Rain | Lok Sabha Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडेंना तिकीट दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले असून, या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत रंगली आहे. त्यानुसार पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरु केलाय. नुकतंच त्यांनी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. आणि वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. यावेळी सर्वांनी मोबाईलचे टॉर्च लावून पंकजा मुंडे यांना प्रतिसाद दिला. पंकजा मुंडे यांनी भर पावसात आपलं भाषण सुरूच ठेवलं. तर लोकांमध्ये देखील पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी हा पाऊस म्हणजे बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचा संकेत असून, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भरसभेत एकप्रकारे हुंकारच भरला. पंकजा मुंडे यांचं मतदारांना आवाहन – यावेळी त्या म्हणाल्या की, “मी नम्र विनंती करून मतदान मागायला आले आहे. आमच्या इथे सभा घ्या, असा फोन राज्यभरातून येत आहेत. पण इतर ठिकाणी मी सभा घेण्यापेक्षा लोकांमध्ये फिरणं मी पसंत करते. मी उमेदवार म्हणून इथं उभी आहे. बीडच्या परिस्थितीत सुधारणा हवा यासाठी मला उमेदवारी मिळाली. पूर्वीला विरोधात राष्ट्रवादीत असलेले आज माझ्यासोबत आहेत. सर्व समाजाचे लोक आज आमच्यासोबत आहेत. जातीवाद नव्हे एकच वाद केला आहे. तो म्हणजे विकास वाद…, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मोदीजींनी दिलेल्या संधीचे सोनं करू – विरोधकांकडे सध्या कुठलाही मुद्दा नाही. त्यामुळे तुमचं मत वाया घालू नका. बीड जिल्ह्याला विकास काय असतो, हे मी दाखवून दिलंय. जात-पात धर्म सोडून मला मतदान करा. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारातील कोणासाठी मत मागायला येणार नाही, असे देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये देशात अनेक मोठमोठ्या नेत्यांची तिकीट कापली. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी मला संधी दिली आहे. त्यामुळे मोदीजींनी जी संधी मला दिली तीचे आपण सोनं करू आणि बीड जिल्ह्याची जनता मला मान खाली घालायला लावणार नाही, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. बघा पंकजा मुंडेंची दहा वर्षात वाढली ‘एवढी’ संपत्ती? 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती – पंकजा मुंडे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेले आपल्या संपत्तीच्या विवरणामध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे एकूण 46 कोटी 11 लाख 33 हजार 967 रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे. आपला उमेदवारी अर्ज भरताना पंकजा मुंडे यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे सहा कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चलसंपत्ती आहे यामध्ये बँकेतील वेगवेगळ्या ठेवी बंद पत्रे विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स तसेच सोन्याचा यात समावेश आहे. पंकजा मुंडेंकडे 32 लाख रुपयाचे सोने – पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी आहे. त्यासोबतच दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने पण आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांची 200 ग्रॅम सोने आणि एक लाख 38 हजार रुपयांचे दोन किलोची चांदी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.