Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ; वैद्यनाथ साखर कारखान्याचा होणार लिलाव

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे.
पंकजा मुंडे या कारखान्याच्या संचालक आहेत. युनियन बँकेने 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असल्याने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया केली आहे.
या कर्जाबाबत छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता. परंतु मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकेचे कर्ज झाले. त्यापैकी युनियन बँक ऑफ इंडियाचे देखील 203 कोटी 69 लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे. मात्र या सगळ्यावर आता पंकजा मुंडे यांची नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.




