Pankaja Munde : ‘मुंडेसाहेब कमळात जन्मले अन्…’; पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ दाव्यावर पंकजा मुंडेंचे थेट उत्तर!
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश (Pankaja Munde) करणार होते आणि त्यांना मंत्रिपद देण्याबाबत चर्चाही झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Pankaja Munde : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश (Pankaja Munde) करणार होते आणि त्यांना मंत्रिपद देण्याबाबत चर्चाही झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
ऐनवेळी हा पक्षप्रवेश थांबला, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
“मुंडे साहेबांविषयी आता बोलणे उचित नाही”
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “त्यांनी वक्तव्य केले होते, पण आता त्याचा काही अर्थ किंवा महत्त्व उरलेले नाही. मुंडेसाहेब आज आपल्यात हयात नाहीत, त्यामुळे आता त्यांच्याविषयी अशा चर्चा करणे औचित्यपूर्ण नाही.
उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. मला जे माझे वडील समजले, ते या कमळात जन्मले आणि कमळातच विसावले, हाच त्यांचा खरा राजकीय प्रवास आहे. आजच्या काळातही लोक आदराने त्यांचे नाव घेतात, पृथ्वीराज बाबांनीही आदरानेच त्यांचे नाव घेतले असेल.”
“मी नाराज नाही, कष्टाने जगते”
स्वतःच्या राजकीय भूमिकेबाबत आणि पक्षांतराच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “माध्यमे कुठल्यातरी एका विधानाचा विपर्यास करतात. मी अजिबात नाराज नाही; मी माझ्या जनतेसाठी कष्टाने काम करते. माझ्या वडिलांनी आयुष्याचा शेवटचा श्वास समाजासाठी घेतला. आमच्यासाठी आधी राष्ट्र आणि मग पक्ष आहे. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी वटवृक्ष बनवले, त्या संघटनेशी आमचे नाते घट्ट आहे.”
“अर्थाचा अनर्थ करू नका”
नाराजीच्या सुरू असलेल्या चर्चांवर माध्यमांना उद्देशून त्या म्हणाल्या, “माझ्या बंजारा समाजातील भाषणातील एका वाक्याचा विपर्यास करून बातमी बनवली गेली. अर्थाचे अनर्थ करू नका, अर्थात बातम्या शोधा, अनर्थात नाही. आम्ही अशा संस्कारात वाढलो आहोत जिथे चांगले दिवस आले तरी माजत नाही आणि संकट आले तरी डगमगत नाही. त्यामुळे मला (Pankaja Munde) कोणालाही दोष द्यायचा नाही.”






