Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांचे वादग्रस्त वक्तव्य; राजकीय वर्तुळात संतापाची लाट
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचे बलिदान यांची एकमेकांशी तुलना केल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे.

Pankaja Munde : महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विकासकामांसाठी होणारी वृक्षतोड आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांचे बलिदान यांची एकमेकांशी तुलना केल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. मुंबई क्लायमेट वीकच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले असून, समाज माध्यमांवर यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील कांदळवन आणि विकास प्रकल्पांसाठी होणारी वृक्षतोड या विषयावर भाष्य करताना मुंडे यांनी एक वेगळा तर्क मांडला. त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे एक माता आपल्या मुलाला लहानाचे मोठे करते आणि अत्यंत धैर्याने त्याला देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवते, अगदी त्याचप्रमाणे आपण झाडे लावली पाहिजेत आणि प्रगतीसाठी गरज पडल्यास ती कापावी लागली तरी मागे सरकता कामा नये.
झाडे तोडली तरी आपण दुसरीकडे अधिक झाडे लावू शकतो, परंतु केवळ वृक्ष जपण्याच्या नावाखाली आपण विकासाला पूर्णपणे नकार देऊ शकत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी झाडांना जवानांची उपमा देताना पुढे असेही नमूद केले की, झाडे जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत ती आपले संरक्षण करतात आणि जेव्हा विकासासाठी ती काढली जातात, तेव्हाही ती प्रगतीचा मार्ग सुकर करून आपले कार्य सुरूच ठेवतात.
या विधानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून, मंत्र्यांच्या या बुद्धिमत्तेची कीव येते, अशी टीका त्यांनी केली. विकासासाठी पाच झाडे तोडली तर त्या बदल्यात दहा झाडे लावणे हाच प्रगतीचा योग्य मार्ग असल्याचे मुंडे यांनी सांगितले. आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून चहा-कॉफी घेत हवामान बदलावर चर्चा करतो, मात्र दुसरीकडे जवान बर्फाच्छादित प्रदेशात आणि वाळवंटात प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात. झाडांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनही असाच कृतज्ञतेचा आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.






