उदयनराजेंकडून पंकजा मुंडेंना तलवार भेट…

दहिवडी – भाजपच्या केंद्रीय नेत्या व राज्याच्या माजी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चरणी महाभिषेक करण्यात आला. शिवशक्ती परिक्रमा तसेच “कै. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अपूर्ण राहिलेले राजकीय, सामाजिक कार्य पूर्ण करण्यासाठी बळ दे. त्याचबरोबर राज्यात पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ देत,’ असे साकडे पंकजा मुंडे यांनी शंभू महादेवचरणी घातले.
खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सचिव जयकुमार शिंदे, सुशांत निबांळकर, माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सभापती अतुल भोसले, नगरसेवक सिद्धार्थ गुंडगे तसेच सातारा जिल्ह्यातून भाजप कार्यकर्ते यावेली मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनीं हा दौरा आयोजित केला आहे. त्यामध्ये घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, शिंगणापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, अंबेजोगाई, परळी असा तीर्थक्षेत्र दौरा तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असे नियोजन करण्यात आले आहे. शंभू महादेवाच्या दर्शनानंतर त्या कोल्हापूरकडे रवाना झाल्या.
उदयनराजेंकडून तलवार भेट…
पंकजा मुंडे यांचे शिंगणापूर येथे आगमन होताच ग्रामपंचायत शिखर शिंगणापूर व माणमधील पळशी ग्रामस्थांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने पंकजा यांना गुलाब पुष्पहार प्रदान करण्यात आला. फटाक्याच्या आतषबाजीत, गुलाब फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शंभू महादेव मंदिरात प्रवेश करताच खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट देऊन त्यांचे स्वागत केले व राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





