दसरा मेळावा : पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर कार्यकर्ते अन् पोलीस आमनेसामने; नेमकं काय घडलं…

सावरगाव – राज्यात आज राजकीय दसरा मेळाव्यांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितला होता. पक्ष व पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होण्यापूर्वीच आता शिंदे यांनी आणखी एक चाल चलत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही दावा सांगितला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे असा दसरा मेळाव्यावरून वाद पेटला असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या आजच्या दसरा मेळाव्याचीही राज्यभरात जोरदार चर्चा होती. मुंडे यांनी आज दुपारी सावरगावात मेळावा घेतला. पंकजा मुंडे यांनी यावेळी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र मुंडे यांच्या भाषणानंतर कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात झालेल्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला खासदार प्रितम मुंडे, यशश्री मुंडे, महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडेंच्या आधी महादेव जानकर व प्रितम मुंडे यांची भाषणे झाली. मात्र पंकजा मुंडे यांचे मुख्य भाषण झाल्यानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस आणि मुंडे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमुळे सभास्थळावर एकच गोंधळ उडाला. या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते. यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. या सर्व गोंधळात तीन तोळ्यांचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली असल्याचे देखील वृत्त आहे.




