Pune : धनकवडीत टोळक्याची कोयता उगारून दहशत

पुणे : धनकवडीत काेयते उगारून टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाइट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवून चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारत जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाणला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.





