पिंपरी | अंत्योदयासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी जीवन व्यतीत केले – महेश कुलकर्णी

पिंपरी, (प्रतिनिधी) – समाजातील सर्वात शेवटच्या घटकाचा समावेश विकासाच्या मुख्य प्रवाहात होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही.
या विचाराने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदय संकल्पना मांडून, त्यानुसार आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यांच्या नावे भारत सरकारने टपाल तिकीट देखील सुरु केले आहे, असे प्रतिपादन महेश कुलकर्णी यांनी केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मोरवाडी येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, युवा मोर्चा सरचिटणीस सतिश नागरगोजे, संजय परळीकर, शिवम डांगे, सचिन राऊत, निमीत सायकर आदी उपस्थित होते.
पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले. १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता.
शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडून उपेक्षितांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिन म्हणून साजरा करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.





