खटाव : पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि शतकानुशतकांच्या परंपरेचे पालन करत खटाव परिसरातील पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. आमलेवाडी येथील ईश्वर प्रसाद पंचक्रोशी आषाढी पायी दिंडीचा पहिला मुक्काम खटाव येथील हनुमान नगरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात, तर इंचगिरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडीचा मुक्काम यशवंत बाबा मंदिरात झाला. तसेच, रामेश्वर पंचक्रोशी पायी दिंडीचे जाखणगाव येथून खटाव नगरीत आगमन झाले, जिथे त्यांचे भक्तिमय स्वागत करण्यात आले. भक्तिमय वातावरणात दिंडीचे स्वागत खटाव नगरीत दिंडीचे आगमन होताच गावागावांत ठिकठिकाणी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. दिंड्या दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. जसजशा दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकतात, तसतसे विविध ठिकाणी त्यांचा पाहुणचार आणि स्वागत मोठ्या उत्साहाने होत आहे. वारकऱ्यांचे नियोजनबद्ध आणि काटेकोर आयोजन, तसेच पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ यामुळे एवढ्या लांब पायी प्रवासातही वारकरी थकल्याचे जाणवत नाही. अभंग, भजन आणि कीर्तनात रंगलेले वारकरी ‘ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम’च्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. काही दिंड्या आता पंढरपूरपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहेत. वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीचा रंग पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या दिंड्यांमुळे खटाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांची तहान-भूक हरवून, ते भक्तीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. पायी दिंडीच्या या सोहळ्याने परिसरातील आध्यात्मिक उत्साह आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.