संतापजनक ! पंढरपूरमधील शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळलं मृत बेडूक

पंढरपूर : पंढरपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मृत बेडूक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गर्भवती महिला व बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात मृत सापाचे पिलू आढळले होते. त्यानंतर नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर गावातील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना उघडकीस आली. या घटनेला आठवडा उलटला नाही तोच, पंढरपुरात पोषण आहारात मृत बेडूक सापडले.
या घटनेमुळे पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. दरम्यान, शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याप्रकरणी प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





