गोल्फ स्पर्धेत पांडे, बेलवल यांचे यश

पुणे -लोढा बेलमोंडो गोल्फ कोर्सवर नुकत्याच सुरू झालेल्या एस गोल्फिंग वतीने आयोजित ब्रिजस्टोन गोल्फ प्रीमियर लीग स्पर्धेत आदित्य पांडे, जगदीश बेलवल या नवोदित हौशी खेळाडूंनी उद्घाटनाचा दिवस गाजवला.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. अट पार 54 दर्जा असलेल्या लोढा, बेलमोंडो गोल्फ कोर्सवर पहिल्या फेरीत पांडे व बेलवल या दोघांनी 6 ओव्हर पार 60 अशा कामगिरीची नोंद केली. मात्र, आदित्य पांडेच्या चमकदार कामगिरी नंतरही त्याच्या ऍमिगोज संघाला पहिली लढत जिंकण्यात अपयश आले व त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली.
ईगल स्ट्रायकर्स (2) आणि बिंदास बॉईज (2) हे संघ पहिल्या दोन स्थानांवर राहिले. ईगल स्ट्रायकर्सच्या जय ठाकूरनेही 9 ओव्हर पार 63 अशी आश्वासक कामगिरी केली. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला एक्को आणि मेश्वर्क्स यांचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण 72 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरीत 12 डिसेंबर रोजी खेळली जाणार आहे. हा फॉरमॅट एस गोल्फिंगच्या आदित्य मालपाणी यांनी तयार केला आहे.





