पुणे | पंचनामे पूर्ण, मदतीची प्रतीक्षाच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सव्वाआठ कोटींची मदत मिळण्याची शासनाकडे मागणीअतिवृष्टी आणि धरणातून विसर्गामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तसेच काही घरांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील एकूण 16 हजार 407 घरांमध्ये पाणी शिरले. तर ग्रामीण भागातील 80 घरांची पडझड झाली आहे.
या नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने एकूण 8 कोटी 23 लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
दि.25 जुलै रोजी रात्री झालेला जोरदार पाऊस तसेच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडल्याने पुणे शहरातील काही भागात पाणी शिरले. पहाटे अचानक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने एकच गडबड झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
तसेच वाहनांचे नुकसान झाले. या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शुक्रवारपासून सुरु करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे काम पूर्ण होऊन तहसीलदारांकडून याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. जिल्हाधिकारी यांनी आर्थिक मदत मिळण्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे.
या अहवालानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 16 हजार 407 घरांमध्ये पाणी शिरले होते. या नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी एकूण 8 कोटी 20 लाख 35 हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. तर ग्रामीण भागातील 80 घरांची पडझड झाली असून त्यांना 3 लाख 26 हजार 500 रुपयांची एकूण मदत मिळावी.
तर दोन गोठ्यांचे नुकसान झाले असून त्यांना एकूण सहा हजार रुपयांची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून हा निधी मिळताच त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.




