Newasa : ‘पंचगंगा पॅटर्न’ सहकारी साखर कारखान्यांना का नको? बाहेरील वजनकाट्याच्या मुभेवरून शेतकऱ्यांचा सवाल!
Newasa : खासगी पंचगंगा साखर कारखान्याप्रमाणे सहकारी कारखान्यांनीही बाहेरील वजनकाट्यावर ऊस वजनाची मुभा द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी.

Newasa : उसाला साडेचार हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात मंगळवारी (दि. १०) झालेल्या रास्ता रोको आंदोलनात वजनकाट्याचा मुद्दाही चर्चेत आला. शिरेगावचे सरपंच किरण जाधव यांनी सहकारी साखर कारखानदारांना थेट सवाल केला.
खासगी पंचगंगा साखर कारखाना शेतकऱ्यांना बाहेरील अधिकृत वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून आणण्याची मुभा देतो, तर सहकारी कारखाने ही परवानगी का देत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ऊस हे शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक आहे. त्यासाठी पाणी, खते आणि मजुरीवर मोठा खर्च होतो. मात्र, कारखान्यात वजन केल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी वजन नोंदवले जात असल्याची शंका अनेक शेतकरी व्यक्त करतात. त्यामुळे वजनकाट्यांची वैध तपासणी आणि वजनाची पावती तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या –
१. सहकारी कारखान्यांनीही बाहेरील अधिकृत वजनकाट्यावर वजन करण्याची मुभा द्यावी.
२. सर्व कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैध मापे विभागामार्फत तपासणी करावी.
३. वजनाची पावती शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी.
‘आम्हाला भीक नको, हक्काचे वजन आणि योग्य भाव हवा,’ अशी भूमिका जाधव यांनी मांडली. सहकारी कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असताना त्यांनाच वजन तपासण्याची मुभा का नाही, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी केला. आता कारखानदार या मागण्यांना काय प्रतिसाद देतात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





