तुम्हालाही नवीन पॅन बनवावा लागेल का? ; मोदी सरकारने आणले नवीन QR कोडचे पॅनकार्ड

PAN 2.0 Project । केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे.
पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने करदात्यांना पॅनकार्डबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पॅनकार्डबाबत करदात्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याकडे सध्या असलेल्या पॅनकार्डचा काही उपयोग नाही का, त्यांच्या जागी नवीन पॅन बनवावे लागणार की दोन्ही पॅनकार्ड असणे आवश्यक आहे? याविषयीची माहिती जाणून घेऊ
पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत बनवलेले कार्ड हे पॅन कार्ड 1.0 प्रोजेक्टचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या पॅनमध्ये QR कोड असेल आणि करदात्यांना तो बनवण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. नवीन पॅन ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पूर्णपणे विनामूल्य तयार केले जाईल.
देशात अंदाजे 78 कोटी पॅन कार्ड जारी PAN 2.0 Project ।
सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
पॅन 2.0 प्रोजेक्टचा फायदा काय? PAN 2.0 Project ।
सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, पॅन 2.0 प्रोजेक्टमुळे केवळ करदात्यांनाच फायदा होणार नाही. मात्र, आयकर विभागाच्या कामकाजातही गती आणि पारदर्शकता येणार आहे. हा प्रकल्प डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता देखील सुनिश्चित करेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, अशी सरकारला आशा आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येईल. तसंच प्राप्तिकर विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सरकारच्या पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत आता नवं बारकोड असलेलं पॅनकार्ड मिळणार आहे. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडला आहे की, नव्या पॅनकार्डचं काय होणार? नवं पॅनकार्ड आलं तरी तुमचा पॅन नंबर बदललं नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तसेच, तुम्हाला अपग्रेडेड प्रक्रियेतून जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळेल. अपडेटेड पॅन कार्ड नव्या फिचर्ससह येणार आहे. यामध्ये QR कोड समाविष्ट असेल. अपग्रेडेट पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे. ते नवं कार्ड तुम्हाला थेट देण्यात येणार आहे. सध्याच्या डिजिटल पद्धतीनं पॅन कार्ड अपग्रेड करणं खूप सोपं होणार आहे. अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असेल, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.





