‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटातील पल्लवी जोशीच्या भूमिकेने वेधलं लक्ष

The Bengal Files | अभिनेत्री पल्लवी जोशीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. यानंतर आता ती विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन करत आहेत. पल्लवी जोशी या चित्रपटात ‘माँ भारती’ या १०० वर्षांच्या महिलेची ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत. यातील तिच्या भूमिकेने सर्वांचे लूक लक्ष वेधून घेतले आहे.
‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटातील भूमिका साकारणं पल्लवीसाठी आव्हानात्मक होते. याबाबत ती सांगते की, “मी साकारलेली भूमिका आजवरच्या माझ्या प्रवासातील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक आहे. वयस्कर दिसणे हे सोपे नाही. प्रोस्थेटिक मेकअपमुळे मी बऱ्याच वेळा भयावह दिसत होते. परंतु आम्हाला प्रेमळ आणि निरागस वाटणारा चेहरा हवा होता. ‘माँ भारती’ या पात्रात मायेची ऊब आणि आपुलकी दिसायला हवी होती,” असे पल्लवी जोशी यांनी सांगितले.
“मी आजीला खूप वृद्ध असताना पाहिले आहे, ती स्वभावाने प्रचंड प्रेमळ होती. त्यामुळे ‘माँ भारती’ ही भूमिका साकारताना मी माझ्या आजीचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवला होता. आम्ही या पात्राच्या लूकवर सुमारे ६ महिने काम केले. त्या काळात माझी त्वचा कोरडी आणि वृद्ध वाटण्यासाठी मी ‘स्किन केअर’ पूर्णपणे बंद केले होते. तसेच ‘माँ भारती’ या पात्राची डिमेन्शिया अवस्था हुबेहूब दाखविण्यासाठी विशेष काम केले. तसेच आमच्या तांत्रिक टीमनेही हा लूक आणि पात्र अधिकाधिक वास्तवदर्शी वाटण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली,” असेही पल्लवी म्हणाली.
‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार या प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तेज नारायण अग्रवाल आणि ‘आय एम बुद्धा’ प्रस्तुत हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स ट्रिलॉजी’चा तिसरा भाग आहे. यापूर्वी या मालिकेतील ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.
‘द बंगाल फाइल्स’ हा हिंदी चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ या नावाने ओळखला जात होता. परंतु आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले आहे. The Bengal Files |
हेही वाचा :





