इंदापूर : ‘भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त’ इंदापूर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य पालखी मिरवणूक अत्यंत उत्साहात, भक्तीभावात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. भाविक सहभागी होत मिरवणुकीला भव्य व दिव्य स्वरूप प्राप्त करून दिले. यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि संयमाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. समाजात शांतता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशा धार्मिक उत्सवांमुळे समाजात एकजूट निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देत हा सोहळा यशस्वी केला, याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी महावीरांच्या पालखीचे पूजन नगराध्यक्ष भरत शहा, भाजप नेते प्रदीप गारटकर, शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, नगरसेवक अक्षय सूर्यवंशी व विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्या हस्ते केले. कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादासाठी नगराध्यक्ष शहा व मुकुंद शहा यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच महाप्रसादाच्या नियोजनासाठी महेंद्र गुंदेचा आणि प्रकाश बलदोटा यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला श्री १००८ शांतीनाथ दि. जैन श्वेतांबर मंदिर व श्री १००८ पार्श्वनाथ दि. जैन मंदिरचे सर्व सभासद तसेच स्थानकवासी जैन समाजाचे श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत श्रेणीक शहा, मिलिंद दोशी, धरमचंद लोढा, नरेंद्र गांधी, पारस बागरेचा, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुदेचा, संजय बोरा, निलेश मोडासे, हुकुमचंद बोरा, संजय दोशी यांनी केले. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देत हा सोहळा यशस्वी केला, याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले.