Palkhi Marg: पालखी मार्गावरील ‘४९ फाटा’ बनला मृत्यूचा सापळा; भरदुपारी ट्रॅक्टरचा ट्रेलर थेट ओढ्यात कोसळला
Palkhi Marg: पुढील महिन्यात याच मार्गावरून मार्गस्थ होणार जगद्गुरु तुकोबांचा पालखी सोहळा; वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

Palkhi Marg – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील जाचक वस्ती येथील ‘४९ फाटा’ (ओढा) परिसरामध्ये पुलाचे काम रखडल्याने शुक्रवारी (दि. १२) दुपारी एका ट्रॅक्टरचा ट्रेलर थेट ओढ्यात पडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रेलरचे चारही चाके वर झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील महिन्यात याच मार्गावरून जगद्गुरु तुकोबांचा पालखी सोहळा जाणार असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या पालखी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. लिमटेकपासून ते इंदापूरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याचे आणि पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. जाचक वस्ती येथील ओढ्यावरील पुलाच्या कडेला केवळ लोखंडी गज (सळया) उभे करून ठेवण्यात आले आहेत, मात्र त्यावर अद्याप सिमेंटचे संरक्षक भिंतीचे काम करण्यात आलेले नाही. या उघड्या गजांमुळे चालकांचा अंदाज चुकतो आणि येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
या रखडलेल्या कामाबाबत जाचक वस्तीचे माजी उपसरपंच विक्रम निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. या धोकादायक वळणावर तातडीने सिमेंटचे संरक्षक पडदे बांधावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज झालेल्या अपघाताने प्रशासनाच्या याच निष्काळजीपणाचा बुरखा फाडला आहे. असे अपघात येथे रोजचेच झाले असून प्रशासन मोठ्या जीवितहानीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत.




