Palghar News : धक्कादायक ! गणपती विर्सजनासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

पालघर : पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे. पालघरच्या बोईसर येथील सरावली गावात १९ वर्षीय राजाबाबू राजकुमार पासवान या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीत विसर्जनादरम्यान तिघे जण वाहून गेले, यापैकी एकाचा शोध अद्याप सुरू आहे.
पालघरमध्ये काय घडले?
२७ जुलै रोजी गणपतीचे घराघरांत आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. याचवेळी, बोईसरच्या सरावली येथे गणपती विसर्जनासाठी तलावात उतरलेल्या राजाबाबू पासवान याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेने विसर्जनस्थळी खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली. राजाबाबूचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून, तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने सरावली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरीतील दुर्घटना
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीतही दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान एक दुखद घटना घडली. विसर्जनासाठी चार ते पाच जण नदीत उतरले होते, परंतु पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तिघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी दोघे जण कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले, मात्र एका व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून, या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दोन्ही घटनांनी गणपती विसर्जनाच्या उत्साहाला गालबोट लावले आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे दिसून येते. या घटनांमुळे प्रशासनाने विसर्जनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.





